July 6, 2024

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२४ वा पदवी प्रदान समारंभ उत्साहात संपन्न, ७,१२५ विद्यार्थी झालेत पदवधीर

पुणे,दि. ३/०७/२०२४: देशात सध्या २६.५ कोटी विद्यार्थी शालेय शिक्षणासाठी नोंदणी करतात. मात्र यापैकी केवळ ४.५ कोटी विद्यार्थीच उच्च शिक्षणासाठी नोंदणी करत आहेत. यामुळे आपल्या देशाचा उच्च शिक्षणातील एकूण नोंदणी प्रमाण (Gross Enrolment Ratio) केवळ २८.३ आहे.

हे प्रमाण जर वाढवायचे असेल तर सध्या देशात जेवढ्या शैक्षणिक संस्था आहेत तेवढ्याच नवीन संस्थांची निर्मिती करावी लागणार असल्याचे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) अध्यक्ष प्रा. टी. जी. सीताराम म्हणाले. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात बोलत होते. विद्यापीठाचा १२४ वा पदवी प्रदान समारंभ आज ३ जूलै रोजी उत्साहात पार पडला.

विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ) सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पदवी प्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) अध्यक्ष प्रा. टी. जी. सीताराम उपस्थित होते. यांच्यासह व्यासपीठावर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. (डॉ.) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. (डॉ.) विजय खरे, वित्त व लेखा अधिकारी सीएमए चारूशिला गायके, विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. (डॉ.) प्रमोद पाटील, वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. (डॉ.) यशोधन मिठारे, आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. (डॉ.) प्रभाकर देसाई, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेंद्र विखे पाटील श्री. रविंद्र शिंगणापूरकर, श्री. संदिप पालवे, प्राचार्य डॉ. नितिन घोरपडे, श्रीमती ज्योत्स्ना एकबोटे, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, प्रा. डॉ. धोंडीराम पवार, श्रीमती बागेश्री मंठाळकर, प्रा. डॉ. संगीता जगताप, श्री. सागर वैद्य आदी उपस्थित होते. या समारंभात ७,१२५ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात आली.

पुढे बोलताना, नवीन शैक्षणिक धोरणात २०३५ पर्यंत उच्च शिक्षणातील एकूण नोंदणी प्रमाण ५० टक्क्यांपर्यत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट जर साध्य करायचे असेल तर आणखी हजार विद्यापीठांची निर्मिती करावी लागणार असून हे देशासमोरील मोठे आव्हान असल्याचे प्रा. टी. जी. सीताराम म्हणाले. तसेच हे प्रमाण वाढविण्यासाठी आपण डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे, जेणेकरुन नवीन शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या पद्धतींद्वारे नवीन विद्यार्थी जोडून घेता येणार अल्याचेही ते म्हणाले. तर आजच्या वेगाने विकसित होत असलेल्या जगात, AI आणि इतर प्रगत तंत्रज्ञानाचे जग व्यापून घेतले आहे आणि याचा शिक्षण, रोजगार आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जर पुढे जायचे असेल तर त्यांनी या तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेणे अत्यावश्यक असल्याचे प्रा. सीताराम म्हणाले.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या अत्यंत महत्त्वकांक्षी राष्ट्रीय शैक्षणिक प्रकल्पाची सुरूवात देशपातळीवर सुरू असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय पातळीवर या धोरणाची अंमलबजावणी करण्यात देशात शीर्ष स्थानावर आहे. या धोरणामुळे नवी पिढी केवळ शिक्षित बनणार नाही तर ते कुशल बुद्धीवादी व रोजगार प्राप्त करण्याची कौशल्ये मिळवलेले साधन व्यक्ती बनणार असल्याचे मत कुलगुरू प्रा.(डॉ.) सुरेश गोसावी यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या वाटचालीचा संक्षिप्त अहवाल उपस्थितांसमोर सादर केला.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘विद्यापीठ वार्ता’ या पदवीप्रदान विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते विविध परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या ७१ विद्यार्थ्यांना ११७ सुवर्ण पदके देऊन सन्मानित करण्यात आले. यात विद्यापीठातील संस्कृत आणि प्राकृत विभागाची विद्यार्थीनी चैत्राली जोशी हिने सर्वाधिक ८, मराठी विभागाची विद्यार्थीनी श्रिया टेंगसे हिने ७ तर पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची विद्यार्थीनी श्रेया गुंजाळने ५ व पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्यूटर टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी प्रतीक अग्रवाल ने ४ सुवर्णपदक प्राप्त केले.

विद्यापीठाच्या इनडोअर हॉलमध्ये झालेल्या या सोहळ्यात ४ हजार ८१४ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र, २ हजार २० विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र, ३५ विद्यार्थ्यांना पदविका प्रमाणपत्र, २३९ विद्यार्थ्यांना पीएच.डी., १४ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी पदविका प्रमाणपत्र तर ३ विद्यार्थ्यांना एम.फिलचे प्रमाणपत्र मिळाले. या कार्यक्रमाला व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विद्या परिषद सदस्य, अधिसभा सदस्य यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्माचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.