July 6, 2024

पुणे: रेन हार्वेस्टिंग योजनेची अंमलबजावणी व्हावी, जुन्या विहिरी जतन करा – सिद्धार्थ शिरोळे

पुणे, ०३/०७/२०२४ – शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी रेन हार्वेस्टिंग योजनेची अंमलबजावणी आणि विहिरींचे जतन, संवर्धन होण्याची गरज आहे, अशी सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (बुधवारी) विधानसभेत बोलताना केली.

शहरातील पाणी परिस्थितीवर मात करण्यासाठी आमदार शिरोळे यांनी मांडलेली सूचना अत्यंत उपयुक्त आहे. रेन हार्वेस्टिंग योजनेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, अशा सूचना पुणे महापालिकेला दिल्या जातील, असे आश्वासन सरकारच्यावतीने उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

शहरातील पाणी प्रश्नावर बोलताना आमदार शिरोळे म्हणाले, पुणे शहराला पाणी टंचाई ला सामोरे जावे लागत आहे ही बाब काही नवीन नाही. वातावरणातील बदलामुळे वारंवार कमी पाऊस पडतो, धरण पूर्ण क्षमतेने भरले जात नाही, पाण्याची वाढती मागणी अशा अनेक कारणांमुळे पाणी टंचाई दर वर्षी ची समस्या झाली आहे.

पुण्याची भूजल पातळी ही खाली जात आहे. वाढत्या कॉंक्रिटीकरणामुळे जमिनी मध्ये पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झाले आहे. जमिनीखाली 300 फुटावर सुद्धा पाणी लागत नाही, अशी स्थिती आहे, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

योग्य पद्धतीने जर रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना शहरात राबवण्यात आली तर पाणी टंचाई ची समस्या काही प्रमाणात नियंत्रित करता येईल. त्या करिता शासनाने नव्याने रेन वॉटर हार्वेस्टिंग चे धोरण आखले पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी काटेकोर पणे केली पाहिजे. तसेच पुणे शहरामध्ये अनेक जुन्या विहिरी आहेत. विहिरींचे संवर्धन व्हावे, याकरिता कायम स्वरूपी धोरण ठरविण्यात यावे, अशी मागणी आमदार शिरोळे यांनी शासनाला केली.