July 6, 2024

पुणे: फिरता वारकरी दवाखाना आजपासून वारकऱ्यांच्या सेवेत

पुणे, २८/०६/२०२४: सिंबायोसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि सौ. शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त फिरता वारकरी दवाखाना वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज झाला आहे. फिरता वारकरी दवाखान्याचे हे २४ वे वर्षे आहे.

सेनापती बापट रस्त्यावरील ‘सिंबायोसिस’च्या आवारात उद्या शनिवारी (दि. २९) सकाळी १०.३० वाजता या फिरत्या दवाखान्याचे उद्घाटन होणार आहे. पुणे महानगर पालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले, साखर आयुक्त कुणाल खेमनार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, ‘सिंबायोसिस’चे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, सौ. शीला राज साळवे मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक माजी नगरसेवक ऍड. अविनाश साळवे आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

संतसेवेचा हा उपक्रम २००१ मध्ये एका अँब्युलंसपासून सुरु झाला. आता दहा सुसज्ज मोठ्या अँब्युलंस, दुचाकी अँब्युलंस व तीनशेहून अधिक डॉक्टर्स, नर्स, स्वयंसेवकांची टीम देहभान हरपून यामध्ये काम करते. वेदनाशामक गोळ्या, औषधे, प्रथमोपचार, तातडीची आरोग्य सेवा व आपत्कालीन सेवा पुरवण्यात येते. पुण्यापासून जेजुरीपर्यंत हा फिरता दवाखाना वारकऱ्यांच्या सेवेत असतो, असे ऍड. अविनाश साळवे यांनी सांगितले.