July 6, 2024

पुणे: विठू माऊलीच्या गजरात तरुणांनी केला ‘कौशल्य विकासाचा’ जागर

पुणे, ०२/०७/२०२४: विठोबाची नित्य गावे, आत्मनिष्ठ कौशल्ये शिकावे…करावी ती पूजा मनेंची उत्तम, कौशल्याची कास असे सर्वोत्तम…जाणिवांना राहो वास्तवाचे भान, कौशल्य शिकावे विसरून देहभान… अशा विविध फलकांच्या माध्यमातून पायी वारी करीत कौशल्य विकासाचे महत्त्व तरुणांनी सांगितले. टाळ मृदुंगाच्या साथीने विठू नामाचा गजर करणाऱ्या तरुणांची ‘कौशल्य विकास दिंडी’ पालखी सोहळ्यात विशेष लक्ष वेधून घेत होती. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत तब्बल ५ हजार प्रशिक्षणार्थींनी ‘कुशल महाराष्ट्र- रोजगारयुक्त महाराष्ट्र’ असा संकल्प केला.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता, नाविन्यता विभाग महाराष्ट्र राज्याच्या वतीने पुणे ते हडपसर दरम्यान कौशल्य विकास दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा पूलगेट पोलीस चौकी येथून दिंडीत सहभागी झाले. यावेळी विभागाच्या आयुक्त निधी चौधरी, संचालक दिगंबर दळवी, सचिव गणेश पाटील, कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी उदय सूर्यवंशी, माजी सहसंचालक राजेंद्र घुमे उपस्थित होते. ‘कुशल महाराष्ट्र- रोजगारयुक्त महाराष्ट्र’ असा संकल्प या दिंडीच्या निमित्ताने करण्यात आला. राज्यातील ५ हजार पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थी या दिंडीत सहभागी झाले होते.

पुण्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था व एमसीव्हीसी (शासकीय व खासगी) संस्थांमधील जवळपास पाच हजार विद्यार्थी, अधिकारी आणि कर्मचारी या दिंडीत सहभागी झाले होते. पारंपारिक वेशात टाळ-मृदुंगच्या गजरात तुळशी वृंदावन घेऊन तरुणाई या कौशल्य विकास दिंडीत सहभागी झाली होती. ‘कौशल्य विकास रथ’ देखील यामध्ये साकारण्यात आला होता.

मंगल प्रभात लोढा म्हणाले, केवळ शालेय शिक्षण नाही, तर कौशल्यपूर्ण शिक्षण हे येत्या काळात अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकऱ्यांच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण घरोघरी पोहोचवण्यासाठी ही दिंडी काढण्यात आली आहे. लोकांनी कौशल्य पूर्ण शिक्षण घेण्यासाठी पुढे यावे, यासाठी जनजागृती या माध्यमातून करण्यात आली.