July 6, 2024

ग्राहकांना चांगल्या सेवा देवून त्यांच्या हक्कांचे रक्षण करा – डॉ. सुहास दिवसे

पुणे, दि.३/०७/२०२४: शासनाच्या विविध विभागांनी ग्राहकांना चांगल्या सेवा देवून त्यांच्या हक्कांचे रक्षण करावे, तसेच बोगस बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे दाखल करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत जिल्हाधिकारी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत आवटे, पुणे महानगरपालिकेचे उपयुक्त (प्रशासन) योगेश हेंके, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.

जिल्हाधिकारी दिवसे म्हणाले, सध्या खरीप हंगाम सूरू असून ग्राहक म्हणून शेतकऱ्यांना चांगली दर्जेदार बी-बियाणे, खते मिळणे आवश्यक आहे. बोगस बियाणे, खते विक्री करणाऱ्यावर लक्ष ठेवावे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना बोगस बियाणांचे वाटप होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे प्रकार आढळल्यास त्वरीत कारवाई करण्यात यावी.

सेवा देतांना पैशाची मागणी करणे, निकृष्ट सेवा देणे हा गुन्हा असून असे प्रकार आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी. ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण वेळेत करावे. ग्राहकांना नुकसान भरपाई वेळेत मिळणे आवश्यक आहे. शासनाने सेवा कायदा लागू केल्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याला बळ मिळत आहे. पुणे जिल्ह्यात ग्राहक संरक्षण कायद्याची अंमलबजावणी चांगली होत असून ती एक चळवळ उभी राहत आहे. ग्राहकांना योग्य आणि मुदतीत सेवा देणे हे प्रत्येक विभागाचे कर्तव्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी आवटे यांनी प्राप्त झालेल्या तक्रारींबाबत माहिती दिली. तसेच अशासकीय सदस्यांच्या तक्रारींवर चर्चा करण्यात आली.